‘दादा, परत या’चा टाहो, पाणावलेले डोळे अन् निःशब्द झालेले वातावरण
महाराष्ट्र. दादा परत या, अशा भावना व्यक्त करत बारामतीकरांनी फोडलेला टाहो, छत्र हरपल्याच्या भावनेने पाणावलेले डोळे आणि निःशब्द वातावरण… बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयातील दृश्य अंतःकरण पिळवटून टाकणारे होते.अजित पवार यांच्या विमान अपघाताचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. बारामतीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. दादांच्या अकाली एक्झीटबाबत हळहळ व्यक्त करत सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि सर्वसामान्यांनी घटनास्थळी धाव घेतली.आपल्या लाडक्या नेत्याचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी लोकांनी मिळेल त्या वाहनाने, काहींनी पायीच अश्रृंनी भरलेल्या डोळ्यांनी प्रवास करत बारामती गाठली. पश्चिम महाराष्ट्रासह कानाकोपऱ्यातून हजारो नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मेडिकल कॉलेज गाठले.दादा आपल्यात नाहीत यावर विश्वासच बसत नव्हता. क्षणार्धात गर्दीचे रूपांतर जनसागरात झाले. ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार, जय पवार, सून ऋतुजा पवार, बंधू श्रीनिवास पवार या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.