अकोल्यात राम प्रगट उत्सव भक्तीभावात संपन्न; राम खिचडी व महाआरतीत हजारोंचा सहभागदहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे सामाजिक समरसतेचा संदेश; शहर राममय
Akola B7 News
अकोल्यात राम प्रगट उत्सव भक्तीभावात संपन्न; राम खिचडी व महाआरतीत हजारोंचा सहभागदहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे सामाजिक समरसतेचा संदेश; शहर राममय
अकोला : अकोला शहरात प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रगट उत्सवानिमित्त श्री जानकी वल्लभो सरकार धर्मार्थ संस्था व श्रीराम नगर मित्र मंडळ यांच्या वतीने दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सामाजिक समरसता, मानवता व एकतेचा संदेश देणाऱ्या या उत्सवाची सांगता राम खिचडी प्रसाद वितरण व भव्य महाआरतीने करण्यात आली. उत्सवाच्या काळात दीपदान, ध्वज स्थापना, “श्रीराम जय राम जय जय राम” जप, हनुमान चालीसा सामूहिक पठण, रामायण व रामरक्षा पठण असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. सकाळी वेदपाठी ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारात विशेष पूजन पार पडले. यावेळी प्रभू श्रीरामचंद्रांच्या बालरूपाचे तसेच राम दरबाराचे आकर्षक दर्शन घडविण्यात आले. यासोबतच प्रभू हनुमानाचे सजीव स्वरूप सादर करण्यात आल्याने भक्त मंत्रमुग्ध झाले.
राम प्रगट उत्सवानिमित्त अकोला शहरात सात ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या, तर २७ मंदिरांमध्ये महाआरतीचे आयोजन करण्यात आले. मोठे राम मंदिर, बिर्ला राम मंदिर, चतुर्भुज कॉलनी, जगदीश्वर, सालासर बालाजी, तपशी बाबा, माळीपुरा, रामदास पेठ, संतोषी माता, रेणुका नगर, खेतान नगर, गौरक्षण रोड, उमरी आदी विविध भागांतील मंदिरांमध्ये मोठ्या भक्तिभावात उत्सव साजरा झाला. संपूर्ण शहर रामनामाच्या घोषात दुमदुमून गेले. कार्यक्रमाला पालकमंत्री अॅड. आकाश फुंडकर, आमदार रणधीर सावरकर, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया तसेच विश्व हिंदू परिषद व रामनवमी शोभायात्रा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. हनुमानाच्या सजीव स्वरूपाचे सादरीकरण आदित्य चव्हाण यांनी केले. उत्सवाच्या सांगतेवेळी हजारो भक्तांना राम खिचडीचा प्रसाद वितरित करण्यात आला. गिरीश जोशी, गिरीराज तिवारी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांद्वारे श्रीराम भक्तीची परंपरा यंदाही उत्साहात जपण्यात आली. भक्ती, संस्कार आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा हा राम प्रगट उत्सव अकोल्याच्या सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक ठरला असून, शहर राममय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.