रामभक्तांसाठी नऊ दिवसांची भक्तिमय पर्वणी ; रामनवमी उत्सवात ५० हजार लक्ष्मीनारायण मूर्तींचे वितरण रामनवमी शोभायात्रा समितीचा सामाजिक उपक्रम; क्षयरोगग्रस्त कुटुंबांना धान्य किट कोतवाली चौकात २५ फुटी नरसिंह–हिरण्यकश्यप वध झाकीचे आकर्षण
Akola B7News
रामभक्तांसाठी नऊ दिवसांची भक्तिमय पर्वणी ; रामनवमी उत्सवात ५० हजार लक्ष्मीनारायण मूर्तींचे वितरण रामनवमी शोभायात्रा समितीचा सामाजिक उपक्रम; क्षयरोगग्रस्त कुटुंबांना धान्य किट कोतवाली चौकात २५ फुटी नरसिंह–हिरण्यकश्यप वध झाकीचे आकर्षण
अकोला : माजी आमदार स्व. गोवर्धन शर्मा यांच्या संकल्पनेतून कार्यरत असलेल्या विहीप-श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्या वतीने यंदाच्या श्रीराम नवमी उत्सवाची तयारी उत्साहात सुरू झाली आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीच्या वतीने सोमवारी इंद्रप्रस्थ टॉवर येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. उत्सवाची सुरुवात बुधवार, १८ मार्च रोजी दुपारी ४ वाजता खंडेलवाल भवन येथे होणार आहे. श्रीराम नवमी शोभायात्रा समिती व जानकी वल्लभो मातृशक्तीच्या वतीने आयोजित “गजर गजाननाचा” या भक्तिमय सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्सवाची सुरुवात होईल. या कार्यक्रमात कथक नृत्य तसेच विविध भक्तिमय सादरीकरण करण्यात येणार असून उल्लेखनीय सेवा देणाऱ्या पाच मंडळांचा मातृशक्तीच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.
गुरुवार, १९ मार्च रोजी गुढीपाडव्याच्या पावन दिनानिमित्त महानगरातील विविध ठिकाणी रामभक्तांच्या सुख-समृद्धीसाठी समितीच्या वतीने ५० हजार आकर्षक लक्ष्मीनारायण मूर्तींचे वितरण करण्यात येणार आहे.
शुक्रवार, २० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता स्थानिक सिटी कोतवाली चौकात वृंदावन येथील लोककलाकारांकडून भव्य कृष्णलीला नाटिका व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.
शनिवार, २१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता सिटी कोतवाली चौकात सांप्रदायिक वारकरी मंडळाच्या वतीने १२५ वारकरी टाळ-मृदुंगाच्या गजरात अभंग सादर करीत पावली सादर करतील. रविवार, २२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता विविध भजनी मंडळांच्या संगीतमय भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सोमवार, २३ मार्च रोजी महाकाल पथकाच्या वतीने संगीतमय आध्यात्मिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.
दरवर्षीप्रमाणे कोतवाली चौकात आकर्षक झाकीचे आयोजन करण्यात येणार असून यंदा २५ फुटांची भगवान नरसिंह व हिरण्यकश्यप वधाची भव्य झाकी सादर केली जाणार आहे. या झाकीचे उद्घाटन मंगळवार, २४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून ही झाकी २६ मार्चपर्यंत रामभक्तांसाठी पाहण्यास उपलब्ध राहणार आहे. दरवर्षीप्रमाणे लाखो भाविक या झाकीचे दर्शन घेण्यासाठी कोतवाली चौकात गर्दी करतात. दरम्यान, समिती सामाजिक दायित्व जपत विविध सेवा उपक्रमही राबवत आहे. समाजातील गरजू २५ क्षयरोगग्रस्त रुग्णांच्या कुटुंबांना दर महिन्याला धान्य किटचे वाटप समितीच्या वतीने केले जात असून भविष्यात या कुटुंबांची संख्या वाढविण्यात येणार आहे. गरजू क्षयरोगी रुग्णांच्या कुटुंबांनी समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या पत्रकार परिषदेला रामनवमी शोभायात्रा समितीचे स्थायी अध्यक्ष कृष्णा गोवर्धन शर्मा, अध्यक्ष अरुण शर्मा, विहिप महानगर अध्यक्ष राजू मंजुळकर, कोषाध्यक्ष राहुल राठी यांच्यासह समितीचे पदाधिकारी व सेवाधारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.