वर्षांपासूनचे प्रकरणही निकाली; राष्ट्रीय लोकअदालतीत मोठा प्रतिसाद ; ८ हजार ३३७ प्रकरणे निकाली २७ कोटी ८१ लाखांहून अधिक रकमेची तडजोड; जिल्ह्यातील विविध न्यायालयांचा सहभाग
Akola B7 News
५० वर्षांपासूनचे प्रकरणही निकाली; राष्ट्रीय लोकअदालतीत मोठा प्रतिसाद ; ८ हजार ३३७ प्रकरणे निकाली २७ कोटी ८१ लाखांहून अधिक रकमेची तडजोड; जिल्ह्यातील विविध न्यायालयांचा सहभाग
अकोला : राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार अकोला जिल्ह्यातील सर्व दिवाणी व फौजदारी न्यायालयांसह कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय तसेच जिल्हा ग्राहक तक्रार आयोग येथे शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोकअदालतीत मोठ्या प्रमाणात प्रकरणांचा समेट होऊन तब्बल ८ हजार ३३७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांपैकी १२ हजार ७९१ प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीत तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी २ हजार २१५ प्रलंबित प्रकरणे आणि ६ हजार १२२ दाखलपूर्व प्रकरणे यामध्ये परस्पर समेट घडवून आणण्यात आला. अशा प्रकारे एकूण ८ हजार ३३७ प्रकरणांचा निकाल लागला.
या लोकअदालतीत मुख्यत्वे दिवाणी, फौजदारी, वैवाहिक वाद, मोटार वाहन अपघात प्रकरणे, कलम १३८ एन. आय. अॅक्ट, ग्रामपंचायतीची घरपट्टी व पाणीपट्टी, तसेच महावितरण आणि बँकांच्या खटल्यापूर्व प्रकरणांचा समावेश होता. या सर्व प्रकरणांमध्ये परस्पर तडजोड होऊन २७ कोटी ८१ लाख ४६ हजार ४८३ रुपयांची रक्कम तडजोडीने निश्चित करण्यात आली. याशिवाय कौटुंबिक वादांमध्येही सकारात्मक परिणाम दिसून आला. परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यासाठी आलेल्या चार पती-पत्नींच्या जोडप्यांनी मतभेद दूर करून पुन्हा एकत्र नांदण्याचा निर्णय घेतला.
या लोकअदालतीत विशेष म्हणजे पती-पत्नीमधील तब्बल ५० वर्षांपासून प्रलंबित असलेला वाद देखील निकाली निघाला. तसेच मोटार अपघात भरपाई (MACT) प्रकरणांमध्येही मोठ्या प्रमाणात निकाल लागल्यामुळे संबंधितांना दिलासा मिळाला. लोकअदालतीच्या माध्यमातून अनेक प्रकरणे सामोपचाराने मिटवली जात असल्याने समाजात सकारात्मक संदेश जात असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन करण्यासाठी तत्कालीन अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे, प्रभारी अध्यक्ष तथा प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. डी. क्षीरसागर, तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव दि. शं. दाभाडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी, वकील वृंद यांचे सहकार्य लाभले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे यु. आर. वाडेगावकर (अधीक्षक), पी. एम. बलिंगे, संजय व्ही. रामटेके, पी. एल. भगेवार, वैभव ग. ताथोड, हरिष इंगळे, धीरज मारके तसेच लोकअभिरक्षक कार्यालयातील विधिज्ञ, न्यायिक कर्मचारी व विधी स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. लोकअदालतीच्या आयोजनासाठी अकोला बार असोसिएशन, पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद कार्यालय यांचेही सहकार्य लाभल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व न्यायाधीश दि. ग. दाभाडे यांनी दिली.