तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड नजीकच्या सौंदळा शिवारात पट्टेदार वाघाच्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे.
Akola B7 News
तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड नजीकच्या सौंदळा शिवारात पट्टेदार वाघाच्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. शेतकरी बाळकृष्ण मनोहर जवंजाळ यांच्या वारखेड शेतशिवारातील शेतात ११ मार्चच्या मध्यरात्रीपासून १२ मार्चच्या पहाटेपर्यंत वाघाने थैमान घालत पाच पाळीव जनावरे आणि एका जंगली डुकरासह एकूण सहा जनावरांचा फडशा पाडला.या घटनेचे प्रत्यक्षदर्शी शेतमजुरांनी सांगितले की, मध्यरात्री अचानक वाघाने हल्ला केल्याने परिसरात भीषण थरार निर्माण झाला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी शेतातील खोलीत आश्रय घेतला, त्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात बचावला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान सौंदळा परिसर, डोंगर मार्ग तसेच पिंपरखेडकडे जाणाऱ्या रस्त्यावर लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये वाघ कैद झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र इतकी गंभीर परिस्थिती निर्माण होऊनही वन विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.ग्रामस्थांचा संतप्त सवाल असा आहे की, कॅमेऱ्यांमध्ये वाघ दिसत असताना आणि जनावरांचे बळी जात असताना वन विभाग नेमका काय करत आहे? जर वेळेत उपाययोजना केल्या नाहीत तर उद्या एखाद्या माणसाचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार?या घटनेनंतर सौंदळा आणि आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने तात्काळ पथक पाठवून वाघाचा बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.आता वन विभाग जागा होणार की आणखी मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहणार? असा संतप्त सवाल संपूर्ण परिसरातून उपस्थित केला जात आहे.