रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर ईदगाहांची पाहणी; आवश्यक कामांना गती
अकोला – पवित्र रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात ईद साजरी करतात. यंदा रमजान ईद २० मार्च किंवा २१ मार्च रोजी चंद्रदर्शनानुसार साजरी होण्याची शक्यता आहे. या दिवशी शहरातील विविध ईदगाहांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक ईदची नमाज अदा करण्यासाठी एकत्र येतात.
त्या अनुषंगाने ईदगाह परिसरात आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी माजी उपमहापौर तथा नगरसेवक रफीक सिद्दीकी यांनी शहर सुधार समितीचे महापौर, उपमहापौर व सभापती तसेच मनपा आयुक्त यांना निवेदन सादर केले होते. या निवेदनाची दखल घेत शहर सुधार समितीचे महापौर, उपमहापौर व सभापती यांनी संबंधित विभागांना तात्काळ आवश्यक कामे करण्याचे आदेश दिले.
ईदपूर्वी ईदगाह परिसर स्वच्छ, सुरक्षित व सुस्थितीत राहावा यासाठी महानगरपालिकेकडून विविध कामांना गती देण्यात आली आहे. त्यानुसार हरिहरपेठ येथील ईदगाह येथे डांबरीकरण, मुरूमाची चुरी टाकणे, परिसराची साफसफाई तसेच रंगरंगोटी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच शहरातील इतर ईदगाहांमध्येही मुरूमाची चुरी टाकणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि रंगरंगोटी करण्याचे निर्देश महानगरपालिकेच्या संबंधित विभागांना देण्यात आले आहेत, जेणेकरून ईदच्या दिवशी नमाजासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये.
दरम्यान हरिहरपेठ ईदगाह येथे प्रत्यक्ष पाहणी दौरा आयोजित करण्यात आला. या पाहणीदरम्यान अकोला शहराचे काजी फैजान काझीमदिन काझी यांच्या उपस्थितीत ईदगाह परिसराची सविस्तर पाहणी करण्यात आली. नमाजासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी मैदानाची स्थिती, प्रवेशमार्ग, स्वच्छता व्यवस्था तसेच आवश्यक दुरुस्तीची कामे याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
यावेळी अकोला महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता अजय गुर्जर, अभियंता आशीष निचड तसेच मनपा कर्मचारी उपस्थित होते आणि संबंधित कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत त्यांना निर्देश देण्यात आले.
या पाहणी दौऱ्यात माजी उपमहापौर तथा नगरसेवक रफीक सिद्दीकी, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे संघटक सचिव जावेद जकारिया, नगरसेवक सैयद रहीम उर्फ सैददु भाई, नगरसेवक सैयद वसीम, समाजसेवक शेख मुझम्मिल, शेख अनीस, समाजसेवक अब्दुल अजीम जाबिर तसेच संबंधित ठेकेदार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी ईदगाह परिसरातील आवश्यक कामे लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनीही सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
ईदच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या या कामांमुळे शहरातील मुस्लिम बांधवांना नमाज अदा करण्यासाठी स्वच्छ व सुस्थितीत परिसर उपलब्ध होणार असून रमजान ईदचा सण शांतता, बंधुता आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा होण्यासाठी मदत होणार आहे.