टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर माजी विद्यार्थी संघाची आगळी-वेगळी होळी; गौरक्षणातून संस्कृतीचा संदेश
Akola B7
टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर माजी विद्यार्थी संघाची आगळी-वेगळी होळी; गौरक्षणातून संस्कृतीचा संदेश
अकोला : रंगांच्या उधळणीसोबतच सामाजिक बांधिलकी जपत टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर, मोठी उमरी येथील माजी विद्यार्थी संघाने यंदाची होळी आणि धुलीवंदन उत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करत समाजासमोर आदर्श ठेवला.
माजी विद्यार्थी संघाच्या पुढाकारातून शाळेच्या आवारातील गौरक्षण परिसराची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. परिसर झाडून स्वच्छ करून श्रीकृष्ण मूर्तीचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर गाई-वासरांचे पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.
या उपक्रमातून “सण साजरा करताना सामाजिक जबाबदारी विसरू नये” हा संदेश देण्यात आला. गोरक्षणाचे महत्त्व, भारतीय संस्कृतीतील गाईचे स्थान आणि पर्यावरणपूरक सण साजरे करण्याची गरज यावर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी गाई-वासरांच्या संगोपनाची जबाबदारी माजी विद्यार्थी संघाने स्वीकारण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. तसेच शाळेच्या परिसराची दर रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्याचा संकल्पही करण्यात आला.
कार्यक्रमाला सुमारे ४० ते ४५ सदस्यांची उपस्थिती होती. पारंपरिक होळीला सामाजिक सेवेची जोड देत साजरा केलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी मनापासून कौतुक केले.
रंग, उत्साह आणि संस्कार यांचा संगम साधणाऱ्या या कार्यक्रमामुळे परिसरात सकारात्मक संदेश पसरला असून, माजी विद्यार्थी संघाच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.