प्रत्येक झोनमध्ये ४ अतिक्रमण निर्मूलन पथके कार्यान्वित करण्याचे महापौर सौ. शारदा खेडकर यांचे निर्देश
AB7
> *जन्म-मृत्यू दाखले देण्याची झोननिहाय सुविधा पूर्ववत करा*
प्रत्येक झोनमध्ये ४ अतिक्रमण निर्मूलन पथके कार्यान्वित करण्याचे महापौर सौ. शारदा खेडकर यांचे निर्देश
अकोला, दि. ९ : अकोला महानगरपालिका क्षेत्रात झोननिहाय जन्म-मृत्यू दाखले देण्याची प्रक्रिया काही कारणास्तव बंद करण्यात आली असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. जन्म-मृत्यूचे दाखले हे अत्यावश्यक शासकीय दस्तऐवज असून शैक्षणिक, वैद्यकीय तसेच विविध शासकीय योजनांसाठी त्यांची तातडीने गरज असते. ही बाब लक्षात घेता नागरिकांच्या सोयीसाठी झोननिहाय जन्म-मृत्यू दाखले देण्याची सुविधा तात्काळ पूर्ववत सुरू करण्याचे निर्देश महापौर सौ. शारदा रणजीत खेडकर यांनी प्रशासनास दिले. तसेच नागरिकांना व विद्यार्थ्यांना जन्म-मृत्यूचे दाखले ठरावीक कालमर्यादेत मिळतील, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शहरातील सार्वजनिक रस्ते, चौक, बाजारपेठा तसेच अनधिकृत बांधकामांमुळे होणाऱ्या अतिक्रमणांमुळे वाहतूक व दैनंदिन रहदारीला अडथळे निर्माण होत आहेत. या अतिक्रमणांवर प्रभावी व वेळेत कारवाई करण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक झोनमध्ये वाहनांसह स्वतंत्र अतिक्रमण निर्मूलन पथके कार्यान्वित करण्यात यावीत, असे निर्देशही महापौरांनी दिले. या पथकांसाठी आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती करून त्यांना वाहन व आवश्यक साहित्य उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून शहरातील अतिक्रमणांवर प्रभावी अंमलबजावणी करता येईल, असा विश्वास महापौर सौ. शारदा रणजीत खेडकर यांनी व्यक्त केला.