धक्कादायक! ‘ बिंदी घर’च्या संचालकाकडून अश्लील व्हिडिओची धमकी देत महिलेवर वारंवार अत्याचार; धर्मांतरासाठीही दबावअकोल्यातील गांधी मार्गावरील कॉस्मेटिक दुकानाशी संबंधित प्रकरण; चार आरोपींविरुद्ध गुन्हा, दोघांना अटक
AB7
धक्कादायक! ‘ बिंदी घर’च्या संचालकाकडून अश्लील व्हिडिओची धमकी देत महिलेवर वारंवार अत्याचार; धर्मांतरासाठीही दबावअकोल्यातील गांधी मार्गावरील कॉस्मेटिक दुकानाशी संबंधित प्रकरण; चार आरोपींविरुद्ध गुन्हा, दोघांना अटक
अकोला : शहरातील गांधी मार्ग परिसरात असलेल्या ‘ बिंदी घर’ या कॉस्मेटिक दुकानाच्या संचालकाने आपल्या साथीदारांसह एका विवाहित महिलेवर अश्लील चित्रफितीच्या आधारे तब्बल दोन वर्षे वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढेच नव्हे तर, पीडित महिलेला धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोपही या प्रकरणात करण्यात आला आहे. अखेर अत्याचार असह्य झाल्याने पीडित महिलेने सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली.
*‘ बिंदी घर’मध्ये बोलावून रचला कट*
गांधी मार्गावरील ‘ बिंदी घर’ या कॉस्मेटिक दुकानाचा संचालक हा संबंधित महिलेचा ओळखीचा होता. ग्राहक म्हणून दुकानात येणाऱ्या महिलेचा भ्रमणध्वनी क्रमांक घेतल्यानंतर तो तिच्याशी सातत्याने संपर्क साधत होता. नवीन माल आल्याचे कारण सांगून तिला दुकानात बोलावण्यात आले. याच दरम्यान, दुकानदाराने आपल्या साथीदारांसह बळजबरी अत्याचार करून त्याची अश्लील चित्रफित तयार केली.
*अश्लील चित्रफितीच्या आधारे ब्लॅकमेल व सतत अत्याचार*
तयार केलेली अश्लील चित्रफित समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत चार आरोपींनी २०२४ ते २०२६ या कालावधीत पीडित महिलेवर वारंवार अत्याचार केले. या अत्याचारासोबतच, धर्मांतर केल्यास चित्रफित डिलीट करू असे सांगून पीडित महिलेवर मानसिक दबाव टाकण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
*अत्याचार असह्य झाल्याने पोलिसांत तक्रार*
सततच्या अत्याचारामुळे मानसिक तणावात सापडलेल्या पीडित महिलेने अखेर शहर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी रहेमान उर्फ मोहम्मद मुस्तफा, चंदू राजू वानखडे, रहेमान गॅरेजवाला आणि मोहम्मद इब्राहिम उर्फ बाबू मोहम्मद तस्लीम तेली यांच्याविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यापैकी दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
*इतर महिलाही बळी ठरल्या का? पोलिसांचा तपास सुरू*
‘परी बिंदी घर’च्या संचालकाने व त्याच्या साथीदारांनी इतरही काही महिला किंवा तरुणींना अशाच प्रकारे धमकावून अत्याचार केला आहे का, याच्याही दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.