> *पराभव न पचल्याने विरोधकांकडून अपप्रचार; जनतेच्या निर्णयाचा अपमान सहन केला जाणार नाही*
भाजपा ही धनाजी–संताजीसारखी ताकद, विरोधकांना सतत दिसते – जयंत मसने
अकोला : लोकशाहीत जनतेने दिलेला स्पष्ट कौल मान्य न करता काँग्रेस व उबाठा सेनेचे नेते सातत्याने बिनबुडाचे व बेछूट आरोप करत आहेत. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा अपमान करणारी ही भूमिका म्हणजे पराभव न पचल्याची लक्षणे असून, अकोलेकर जनता हा अपमान कधीही सहन करणार नाही, असा कडवट इशारा भाजप महानगर अध्यक्ष जयंत मसने यांनी दिला. भाजपाचे नेते विरोधकांना धनाजी–संताजीसारखे सतत दिसत असून, पराभवामुळे हताश व नैराश्यग्रस्त झालेले काही नेते पिण्याच्या पाण्यातही भाजपा पाहत असल्याची टीका त्यांनी केली. आत्मचिंतन न करता “मेरी मुर्गी की एक टांग” या भूमिकेतून आरोप करणे म्हणजे लोकशाहीची थट्टा असल्याचे त्यांनी सांगितले.जयंत मसने यांनी सांगितले की, राजराजेश्वर नगरी अकोला येथील जनतेने भारतीय जनता पक्षावर विश्वास व्यक्त करत ३८ जागांवर भाजपाला तर महायुतीचे एकूण ४१ नगरसेवक विजयी केले आहेत. असे असतानाही लोकशाहीचा व जनादेशाचा अवमान करणारे आरोप केले जात आहेत. अकोल्याच्या करप्रणाली संदर्भात सुप्रीम कोर्टात काँग्रेसने धाव घेतल्यानंतरही न्यायालयाचा निर्णय न मानता अपप्रचार करण्यात आला; तरीही जनतेने भाजपालाच सर्वाधिक जागा दिल्या, हे वास्तव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मतदारांनी दिलेला स्पष्ट जनादेश मान्य नसल्यामुळेच अशा प्रकारचे आरोप केले जात असल्याचा आरोप करत, भाजपा ही ताकद आहे, जी धनाजी–संताजीसारखी विरोधकांना सतत दिसत राहील, असा विश्वास जयंत मसने यांनी व्यक्त केलेला आहे