एमआयडीसी-खदान परिसरात दहशत माजवणारी लुटारू टोळी ४८ तासांत जेरबंदस्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; एक आरोपी व तीन विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात
AB7
एमआयडीसी-खदान परिसरात दहशत माजवणारी लुटारू टोळी ४८ तासांत जेरबंदस्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; एक आरोपी व तीन विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात
अकोला : एमआयडीसी व खदान परिसरात प्राणघातक हल्ला करून लुटमार करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांनी अवघ्या ४८ तासांत जेरबंद केले आहे. या कारवाईत एक प्रौढ आरोपीसह तीन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या चार अज्ञात आरोपींनी प्राणघातक हल्ला करत लुटमार केली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. एमआयडीसी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे तपास वेगाने पुढे नेला. तपासादरम्यान १० एप्रिल रोजी सकाळी हर्षदीप भाऊराव डोंगरे (वय २०, रा. कृषीनगर, अकोला) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली देत इतर तीन साथीदारांची माहिती दिली. त्यानंतर रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून उर्वरित तीन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत या टोळीने ९ एप्रिल रोजीही आणखी एक लुटमार केल्याचे उघड झाले असून त्या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ताब्यातील आरोपींना पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, अल्पवयीन आरोपींवर जेजे अॅक्टनुसार कठोर कारवाई करण्यासाठी न्यायालयात प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी व सहायक पोलीस अधीक्षक ईशानी आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.