८ एप्रिलला राज्यभर आरटीओ कार्यालयांवर ऑटोरिक्षा चालकांचा मोर्चा कल्याणकारी मंडळासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्काविरोधात आंदोलन; सक्ती तत्काळ थांबवण्याची मागणी
Akola B7 News
८ एप्रिलला राज्यभर आरटीओ कार्यालयांवर ऑटोरिक्षा चालकांचा मोर्चा
कल्याणकारी मंडळासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्काविरोधात आंदोलन; सक्ती तत्काळ थांबवण्याची मागणी
अकोला : महाराष्ट्रातील सर्व प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयांवर बुधवार, ८ एप्रिल २०२६ रोजी ऑटोरिक्षा चालक-मालकांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या नोंदणीसाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्काविरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे.ऑटोरिक्षा चालकांकडून ५०० रुपये प्रवेश फी आणि ३०० रुपये वार्षिक शुल्क भरण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप चालक संघटनांकडून करण्यात आला आहे. या सक्तीमुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या चालकांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.सक्तीविरोधात संतापसंघटनांच्या म्हणण्यानुसार, कल्याणकारी मंडळात नोंदणी न केल्यास परवाना नुतनीकरण, पासिंग यांसारखी कामे रोखली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. ही सक्ती पूर्णपणे बेकायदेशीर असून तात्काळ थांबवावी, अशी मागणी कृति समितीकडून करण्यात आली आहे.शासनाकडे निवेदन, तरीही कार्यवाही नाहीया संदर्भात २३ मार्च २०२६ रोजी परिवहन मंत्री व परिवहन आयुक्त यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने चालकांमध्ये नाराजी वाढली आहे.राज्यभर आंदोलनाची हाकया पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व आरटीओ कार्यालयांवर एकाच दिवशी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने ऑटोरिक्षा चालक व मालक सहभागी होणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.कल्याणकारी मंडळ की भार?रिक्षाचालकांसाठी स्थापन करण्यात आलेले कल्याणकारी मंडळ खरोखरच चालकांच्या हितासाठी आहे की परिवहन विभागाच्या फायद्यासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात असून या धोरणाचा फेरविचार करण्याची मागणी जोर धरत आहे.