भजन संध्या व ढोल वादनाने कोतवाली परिसर भक्तिमय; आज हिरण्यकश्यप वध देखावा आकर्षण रामनवमी उत्सवात श्याम भजन, महाकाली ढोल पथकाची दणदणीत सादरीकरण; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Akola B7
भजन संध्या व ढोल वादनाने कोतवाली परिसर भक्तिमय; आज हिरण्यकश्यप वध देखावा आकर्षण रामनवमी उत्सवात श्याम भजन, महाकाली ढोल पथकाची दणदणीत सादरीकरण; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अकोला : माजी आ. स्व. गोवर्धन शर्मा प्रणित विहीप-श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्या वतीने सिटी कोतवाली चौकात सुरू असलेल्या रामनवमी उत्सवाला रामभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या निमित्ताने आयोजित भजन संध्या आणि ढोल वादनाने परिसर भक्तिमय वातावरणात रंगून गेला.या कार्यक्रमात भजनकार उमेश शर्मा (डब्बू) व भजन गायिका नेतल शर्मा यांनी श्याम भजनांची सुरेल मैफल सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. व्यासपीठावर साकारण्यात आलेल्या भव्य श्याम बाबांच्या प्रतिमेसमोर उमेश शर्मा यांनी सादर केलेल्या भक्तिगीतांनी वातावरणात भक्तिभाव निर्माण झाला. कार्यक्रमाचा समारोप सामूहिक श्याम आरतीने करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी रामनवमी शोभायात्रा समितीचे स्थायी अध्यक्ष कृष्णा शर्मा, अध्यक्ष अरुण शर्मा, विहिप महानगर अध्यक्ष राजू मंजुळकर, राहुल राठी, मनीष बाछुका, नितीन जोशी, संदीप वाणी आदींनी भजनकारांचे स्वागत केले. तसेच माजी अध्यक्ष शैलेश खरोटे यांची अकोला जिल्हा सोनार संघाच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. उत्सवात सोमवारी रात्री महाकाली ढोल पथकाने दमदार ढोल वादन करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. शोभायात्रा समितीच्या वतीने विशेष ढोल वादनाची व्यवस्था करण्यात आली होती, ज्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, मंगळवार दि. २४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता सिटी कोतवाली चौकात गुजरात अंबुजाच्या सहकार्याने पंचवीस फूट उंचीचा भगवान नरसिंह व हिरण्यकश्यप वधाचा भव्य देखावा सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.कार्यक्रमाचे संचालन सौरभ शर्मा व बाळ बिडवई यांनी केले. दि. २६ मार्चपर्यंत सुरू राहणाऱ्या या रामनवमी उत्सवाचा महिला व पुरुष भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.उत्सवात विहिप रामनवमी शोभायात्रा समिती, जानकी वल्लभो मातृशक्तीचे पदाधिकारी, सेवाधारी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.