अकोला शहरात पाणीपुरवठा आता चौथ्या दिवशी काटेपूर्णा धरणातील पाणीसाठा घटल्याने मनपाचा निर्णय; नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन
Akola B7 News
अकोला शहरात पाणीपुरवठा आता चौथ्या दिवशी काटेपूर्णा धरणातील पाणीसाठा घटल्याने मनपाचा निर्णय; नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन
अकोला : वाढत्या उन्हाळ्यामुळे आणि काटेपूर्णा प्रकल्पातील पाणीसाठ्यात होत असलेल्या घटेमुळे अकोला शहरातील पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. महानगरपालिका प्रशासनाने शहरात दोन दिवसाआड सुरू असलेला पाणीपुरवठा आता तीन दिवसाआड म्हणजेच चौथ्या दिवशी करण्याचा निर्णय घेतला आहे.काटेपूर्णा प्रकल्प (महान) येथे १२ मार्च रोजी ३९.०४९ दलघमी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. वाढत्या उष्णतेमुळे होणारे वाष्पीभवन आणि वाढती मागणी लक्षात घेता धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने घट होत आहे. या पार्श्वभूमीवर अकोला महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील ६५ एमएलडी प्लांटवरून होणारा पाणीपुरवठा चौथ्या दिवशी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार महाजनी जलकुंभ, मोठी उमरी, गुडधी जलकुंभ, नेहरू पार्क जलकुंभ, तोष्णीवाल जलकुंभ, आदर्श कॉलनी जलकुंभ, केशव नगर जलकुंभ, रेल्वे स्टेशन जलकुंभ, गंगा नगर जलकुंभ, अकोट फैल जलकुंभ, जोगळेकर प्लॉट जलकुंभ आणि लोकमान्य नगर जलकुंभ या भागांमध्ये चौथ्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. याबाबत माहिती देताना मनपा पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल डोईफोडे यांनी नागरिकांनी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. तसेच नागरिकांनी पाण्याची पुरेशी साठवणूक करून पाण्याचा अपव्यय टाळावा आणि पाणी जपून वापरावे, असेही त्यांनी सांगितले.rमनपा प्रशासनाने शहरातील नागरिकांना या बदलाची नोंद घेण्याचे आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जबाबदारीने पाणी वापरण्याचे आवाहन केले आहे.