राऊतवाडी बगीच्यातील विहिरीला आग; अग्निशामक दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे विहिरीत भडका; नागरिकांच्या सूचनेवरून नगरसेवक विजय अग्रवाल यांनी तातडीने अग्निशामक दलाला पाचारण
Akola B7 News
राऊतवाडी बगीच्यातील विहिरीला आग; अग्निशामक दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे विहिरीत भडका; नागरिकांच्या सूचनेवरून नगरसेवक विजय अग्रवाल यांनी तातडीने अग्निशामक दलाला पाचारण
अकोला शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील राऊतवाडी परिसरातील बगीच्यात असलेल्या विहिरीमध्ये लागलेल्या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विहिरीमध्ये टाकण्यात आलेल्या कचऱ्याला अचानक आग लागल्याने आगीचा भडका उडाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांनी प्रभाग क्रमांक ५ चे नगरसेवक विजय भाऊ अग्रवाल यांना फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच नगरसेवक विजय अग्रवाल यांनी त्वरित अग्निशामक दलाशी संपर्क साधून घटनास्थळी गाडी पाठवली. अग्निशामक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने विहिरीतील आग आटोक्यात आणली. या वेळी नगरसेवक विजय अग्रवाल देखील घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली. अग्निशामक दलाच्या तत्पर कारवाईमुळे आग पूर्णपणे विझवण्यात यश आले असून मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, विहिरीमध्ये सतत कचरा टाकला जात असल्याने अशा घटना घडत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. त्यामुळे परिसरातील कचरा टाकण्यावर नियंत्रण ठेवण्याची तसेच स्वच्छतेची उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे