शहरातील सिटी कोतवाली परिसरात शनिवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत सहा दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली.
Akola B7 News
Akola शहरातील सिटी कोतवाली परिसरात शनिवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत सहा दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली. या आगीमुळे परिसरात काही काळ मोठी धावपळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली, मात्र फायर ब्रिगेडची गाडी वेळेवर न आल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास एका दुकानातून धूर निघताना दिसल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ दुकानदारांना व पोलिसांना खबर दिली. काही मिनिटांतच आगीने भीषण रूप धारण करत शेजारील दुकानांनाही विळखा घातला. आगीत किराणा, कपडे व इतर साहित्य विक्रीची एकूण सहा दुकाने जळून खाक झाली असून मोठे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.दरम्यान, आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, फायर ब्रिगेडची गाडी उशिरा आल्यामुळेच नुकसान वाढल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. “फायर ब्रिगेड हाकेच्या अंतरावर असतानाही गाडी वेळेवर आली नाही. अशा परिस्थितीत ‘इंसान तो जीते जी मर जायेगा…’,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिस व प्रशासनाकडून आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.