शब-ए-बरात निमित्त कब्रस्तानात प्रकाश व स्वच्छतेची मागणी
अकोला : दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी मुस्लिम समाजाचा पवित्र सण शब-ए-बरात (मोठी रात्र) साजरी होत असून, या पार्श्वभूमीवर अकोला शहरातील सर्व कब्रस्तानांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
माजी उपमहापौर व नवनिर्वाचित नगरसेवक रफीक सिद्दीकी यांनी माननीय महापौर तसेच अकोला महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन सादर करून, शब-ए-बरातच्या रात्री शहरातील विविध मुस्लिम भागांतील कब्रस्तानांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक प्रार्थनेसाठी उपस्थित राहत असल्याने कब्रस्तान व परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था, स्वच्छता तसेच कचरा उचलण्याची योग्य व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
अकोला शहरातील मासूम शाह कब्रस्तान, नायगाव कब्रस्तान, अकोट फैल कब्रस्तान, खदान कब्रस्तान, शिवणी कब्रस्तान, चांद खा प्लॉट कब्रस्तान तसेच खैर मोहम्मद प्लॉट (RPTS) कब्रस्तान या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. त्यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी महानगरपालिकेने योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी नगरसेवक फैयाज खान, वसीम खान तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटक सचिव जावेद जकरिया यांनीही या मागणीला पाठिंबा दर्शवला. शब-ए-बरात ही मुस्लिम समाजासाठी अत्यंत महत्त्वाची व पवित्र रात्र असून, या दिवशी महानगरपालिकेने सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महानगरपालिकेने या मागणीवर सकारात्मक व तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
यासंदर्भात आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, विजय अग्रवाल जयंत मसणे, विजय देशमुख सुनील मेश्राम रफिक सिद्दिकी यांनी महापौर शारदाताई खेडकर तसेच आयुक्त सुनील लहाने यांना सूचना दिल्या असून तसेच विद्युत विभाग, पाणीपुरवठा विभाग, सफाई विभागाला सूचना देण्यात आले आहे