वडिलांच्या मृत्यूने कोसळलेल्या पूनमचे अश्रू थांबेनात.ज्यांच्या हातून कन्यादान व्हायचे, त्याच बापाचे सरण आधी रचले गेले…
AB7
घरात लग्नाची तयारी, अन् डोळ्यांत अश्रूचा महापूर!
मालेगाव (जि. वाशिम) : घरात मुलीच्या लग्नाची लगबग सुरू असतानाच वधूपित्याच्यानिधनाची वार्ता समजताच आनंदाचे क्षण क्षणात दुःखात परिवर्तित झाले. पांगरी नवघरे येथील अल्पभूधारक शेतकरी राजू हरिभाऊ कालापाड (वय ४०) यांनी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन जीवन संपविल्याची हृदयद्रावक घटना २१ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण गाव सुन्न झाले.नावे दीड एकर शेती असलेले राजू कालापाड यांची मुलगी पूनम हिचे लग्न येत्या १४ मार्च रोजी ठरले होते. घरात वधू-वरांच्या कपड्यांची खरेदी, पाहुण्यांच्या याद्या आणि तयारीची लगबग सुरू होती. मात्र, या आनंदामागे आर्थिक विवंचनेची खोल जखम दडलेली होती. कष्टकरी बापाला मुलीच्या लग्नासाठी निधीची जुळवाजुळव करता आली नाही. गत आठ दिवसांपासून ते ओळखीच्या प्रत्येक दरवाजावर मदतीसाठी धाव घेत होते; मात्र अपेक्षित मदत मिळाली नाही. या विवंचनेतूनच त्यांनी टोकाचा निर्णय घेत जीवन संपविले.मनावरचे ओझे असह्य झाले!लग्नाची तारीख जवळ येत असताना आणि हातात पैसे नसल्याने मानसिक ताण वाढत गेला. २० फेब्रुवारीच्या सायंकाळी राजू कालापाड कुणालाही काही न सांगता घरातून निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारच्या शेतकऱ्यांना शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला.पूनमचे अश्रू थांबता थांबेनात !राजू यांच्या पश्चात पत्नी उषा, मुलगी पूनम, दोन लहान मुले पवन व अक्षर आणि वृद्ध आई असा परिवार आहे. वडिलांच्या मृत्यूने कोसळलेल्या पूनमचे अश्रू थांबेनात.ज्यांच्या हातून कन्यादान व्हायचे, त्याच बापाचे सरण आधी रचले गेले… या नियतीच्या क्रूर खेळाने गावकऱ्यांच्याही डोळ्यांत पाणी आणले.