बेरोजगार तरुणांच्या खात्यावरुन शंभर ते सव्वाशे कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार, सहकारी बँकेतील प्रकाराने…
Nashik Crime News:विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवघ्या १५ दिवसांत १०० कोटी रकमेची खात्यातून उलाढाल होणे, आणि ज्यांच्या खात्यातून ती उलाढाल झाली त्यांना माहीतच नसणे म्हणजे यात काहीतरी गौड बंगाल नक्की आहे.
नाशिक जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मालेगाव येथील मर्चेंट बँकेच्या शाखेत गेल्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये जवळजवळ १२ खात्यांमध्ये शंभर ते सव्वाशे कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाले आहे. शहरातील बेरोजगार तरुणांच्या खात्यांवरून ही उलाढाल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यांच्या नावे हे व्यवहार होताहेत त्यांना मात्र याबाबत काहीही कल्पना नाही. शिवसेना पदाधिकारी व बेरोजगार तरुण यांनी मालेगाव येथे पत्रकार परिषद घेत हे आरोप केले आहेत..
मालेगावातील 12 बेरोजगार तरुणांच्या नावावर बनावट कंपन्या तयार करून कुणाच्या नावावर 10 तर कुणाच्या नावावर 15 कोटी अशा रक्कमेपर्यंत व्यवहार नाशिक मर्चंट बँकेच्या मालेगाव येथील शाखेत करण्यात आले आहे. या तरुणांना मालेगाव बाजार समितीत नोकरीचे आमिष दाखवत सिराज अहमद या इसमाने तरुणांचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि सह्या घेत नाशिक मर्चेंट बँकेत (मालेगाव शाखा) बनावट खाती उघडली व त्या खात्यावरून गेल्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये शेकडो कोटींचे आर्थिक व्यवहार केल्याचे समोर आले आहे..
हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर या १२ तरुणांनी मंत्री दादा भुसे यांच्याकडे धाव घेतली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्या तरुणांनी केली आहे. या पार्श्वभूमी शिवसेना पदाधिकारी व बेरोजगार तरुण यांनी पत्रकार परिषद घेत मागणी केली. दरम्यान, या प्रकरणी अपर पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार देण्यात आली असून हा व्यवहार कोणी केला? यामागे कोणाचा हात आह ? याबाबत पोलिसांकडून चौकशी सूरू करण्यात आली आहे..