ताज्या घडामोडी

“तुटेल इतकं ताणू नये”, उद्धव ठाकरे यांचं काँग्रेसला उद्देशून मोठं वक्तव्य

महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरे गट आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाने उघडपणे नाना पटोले यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. या वादावार उद्धव ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

भाजप नेते राजन तेली यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. राजन तेली यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी जात ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी जागावाटपावरुन काँग्रेस आणि ठाकरे गटात झालेल्या वादावर भूमिका मांडली. महाविकास आघाडीची जागावाटपाबाबतची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे गटाचे नेते आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात खटके उडाल्याची माहिती आहे. त्यामुळे ठाकरे गटाने नाना पटोले यांच्याविरोधात अधिकृत भूमिका मांडली. नाना पटोले असतील तर या पुढे जागावाटपाची बैठक होणार नाही, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागावाटपाचा वाद विकोपाला पोहोचला. आता या वादानंतर दोन्ही बाजूने सारवासारव केली जात आहे. असं असताना उद्धव ठाकरे यांनी तुटेपर्यंत ताणू नये, असा इशारा काँग्रेसला दिला आहे.

उद्धव ठाकरे यांना यावेळी काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यातील जागावाटपाबाबत असलेल्या वादाबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता, “मी याबद्दल माहिती घेईन आणि तुमच्याशी बोलेन”, असं ते सुरुवातीला म्हणाले. “मी याबद्दल माहिती घेऊन आपल्याशी बोलेन. एका पेक्षा जास्त पक्ष जेव्हा एकत्र निवडणूक लढवतात तेव्हा नाही म्हटलं तरी जागांच्या बाबतीत थोडीशी खेचाखेची होते. पण ती तुटेपर्यंत ताणायची नाही हे सगळ्या पक्षांनी लक्षात ठेवलं पाहिजे”, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

‘फार मोठा वाद झालेला नाही’

“मला असं वाटतं की, अजूनही असा फार मोठा वाद झालेला नाही. तसं काही माझ्या कानावर आलं नाही. मगाशी खासदार संजय राऊत हे देखील येऊन गेले. आमदार अनिल परब हे देखील इथेच आहेत. माझ्या कानावर ज्यावेळेला येईल त्यावेळेला मी नक्की बोलेन. दोन-तीन दिवसांत किंवा उद्या जागावाटप संपू शकतो. तो विषय अंतिम टप्प्यात आलेला आहे. जागावाटप जाहीर झालेलं नाही. प्रत्येक पक्ष वेगवेगळा आहे. विलीनीकरण झालेलं नाही. साहजिकच आहे, याआधी आम्ही एकमेकांच्या विरुद्ध लढलेलो आहोत. लोकसभेला जागा कमी होत्या, विधानसभेला जास्त होत्या. त्यामुळे जागावाटपाबाबत चर्चा होईल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत मविआचं सरकार येणार’

“महाराष्ट्रातील राजकीय वातावरण बदललं आहे. महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. किंवा महाविकास आघाडीचं सरकार आणणारच हे महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलं आहे. राजन तेली यांच्या संघर्षाला अंतिम रुप द्यायचं आहे म्हणून ते परत शिवसेनेत आले आहेत”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

यावेळी उद्धव ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबतही प्रश्न विचारण्यात आला, त्यावर त्यांनी “कधीतरी गोलमाल होतो, जसा लोकसभेत अमोल कीर्तिकर यांच्यावेळी गोलमाल झाला, तसा कोकणात झाला असेल. पण कोकणात शिवसेना ही एकजीव आहे. शिवसेनेला कोकणापासून आणि कोकणाला शिवसेनेपासून कोणी तोडू शकत नाही हे येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा सिद्ध करुन दाखवू”, अशी प्रतिक्रिया दिली.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.