कल्याण रेल्वे स्थानकात नशेखोर तरुणांनी महिलेला छेडलं, संतप्त महिलेने केलं असं काही…
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ नशेतील तरुणांनी एका महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली. महिलेने धाडसीपणे प्रतिसाद देऊन त्यांना चोप दिला. ही घटना स्थानकाच्या परिसरातील सुरक्षेच्या कमतरतेकडे लक्ष वेधते.
महाराष्ट्रात एकीकडे विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. एकीकडे राज्यात मतदान पार पडत असताना काल कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात काही नशेखोर तरुणांनी एका महिलेची छेड काढल्याचे पाहायला मिळाले. यानंतर त्या महिलेने तरुणाला चोप देत चांगलाच धडा शिकवला. सकाळी 5.30 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे कल्याण स्टेशन परिसरात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात पहाटे 5.30 च्या सुमारास एक महिला आपल्या पतीसोबत जात असताना एका महिलेची छेड काढल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही महिला तिच्या पतीसोबत त्या ठिकाणी रात्रभर सुरु असलेल्या बुर्जी पावच्या गाडीवर नाश्ता करत होती. यावेळी 5 ते 6 नशेखोरांनी तिची छेड काढली. वारंवार विरोध करूनही या मधील एका तरुणाने त्या महिलेला धक्का दिला. तर दुसरा तरुण महिलेच्या अंगावर गेला. यानंतर संतप्त झालेल्या महिलेने त्या तरुणाला चांगलाच चोप दिला. साधारण अर्धा तास हा प्रकार सुरु होता.
स्थानिक नागरिकांच्या मध्यस्थीनंतर या तरुणांनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र या घटनेमुळे स्टेशन परिसर हा नशेखोराचा अड्डा बनल्याच पुन्हा एकदा समोर आले. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात रात्रभर खुलेआम अनधिकृतरित्या बुर्जी पावची गाडी सुरु असते. या गाड्यांवर खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात नशेखोर येत असतात. यामुळे परिसरातून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यातही विशेषतः महिलांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
या घटनेने प्रशासन आणि स्थानिक पोलिसांसमोर परिसरातील सुरक्षेचा प्रश्न गंभीरपणे उपस्थित केला जात आहे. यामुळे अशा अनधिकृत गाड्यांवर कारवाई करून त्यांना हटवावे. तसेच, स्थानक परिसरात पोलीस गस्त वाढवून सुरक्षेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.