“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, अब्दुल सत्तार यांचे विधान, म्हणाले “त्या नेत्यांमध्ये माझं नाव…”
नुकतंच अब्दुल सत्तार यांनी अजिंठा या ठिकाणी जाहीर सभा घेतली. या सभेत अब्दुल सत्तार यांनी नाव न घेता रावसाहेब दानवे आणि विरोधकांवर टीका केली आहे.
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघात एकाच दिवशी २० नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल जाहीर होईल. त्यातच आता विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांनी वादग्रस्त विधान केले आहे. मी मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवू शकतो, तर हे किरकोळ लोक माझे काय करणार, असे अब्दुल सत्तार म्हणाले. अंजिठा येथे झालेल्या सभेत अब्दुल सत्तार यांनी हे वक्तव्य केले.
अब्दुल सत्तार हे जालना जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने प्रचार करताना दिसत आहेत. आता नुकतंच अब्दुल सत्तार यांनी अजिंठा या ठिकाणी जाहीर सभा घेतली. या सभेत अब्दुल सत्तार यांनी नाव न घेता रावसाहेब दानवे आणि विरोधकांवर टीका केली आहे.
“विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली”
“मला कुत्रा निशाणी मिळाली तरी मी निवडून येऊ शकतो. सध्या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते खालच्या पातळीवर जाऊन जातीपातीवर मतं मागत आहेत. महाराष्ट्रात मोजून चार पाच नेते आहे, त्यात माझं नाव आहे. पण काही लोक त्यामुळे माझ्यावर जळतात”, असे अब्दुल सत्तार म्हणाले.
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद”
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद आहे. हे किरकोळ लोक माझ्याशी काय सामना करणार आहेत. मी गेल्या 25 वर्षांमध्ये कोट्यावधी रुपयांची काम केली आहेत. जो विकास कामे करतोय, त्याला मतदान करा”, असे आवाहन अब्दुल सत्तार यांनी केले. अब्दुल सत्तार यांनी अजिंठा येथे केलेल्या विधानामुळे ते अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
चौथ्यांदा आमदार होण्यासाठी सत्तार रिंगणात
दरम्यान जालना जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघ हा राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मतदारसंघ अशी ओळख आहे. विद्यमान मंत्री अब्दुल सत्तार हे या मतदारसंघातून पुन्हा रिंगणात आहे. अब्दुल सत्तार यांनी तीन वेळा या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. आता त्यांना चौथ्यांदा आमदार व्हायचंय, यासाठी ते जाहीर सभा घेत जोरात प्रचार करताना दिसत आहेत.