> *भव्य स्वरूपात साजरी होणार शिवजयंती; नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक*
अकोल्यात ‘जय शिवाजी जय भारत‘ पदयात्रा
अकोला, दि. १७ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. 19 फेब्रुवारी रोजी अकोला येथे वसंत देसाई क्रीडांगणापासून सकाळी 7.30 वाजता ‘जय शिवाजी जय भारत‘ पदयात्रा काढण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात हा उपक्रम होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल उद्घाटन होणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अधिकाधिक लोकसहभाग मिळवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.पदयात्रेच्या नियोजनासाठी बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत त्यांच्या दालनात झाली, महापालिका आयुक्त सुनील लहाने,निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, शिक्षणाधिकारी सुचेता पाटेकर, रतनसिंग पवार यांच्यासह अनेक यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, ‘जय शिवाजी, जय भारत’ उपक्रमात जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, कार्यकर्ते या सर्वांचा सहभाग मिळवावा. पदयात्रेत लेझिम, ढोल पथक, देखावे, वाद्यवृंद, शौर्यगीते आदी यांच्यासह वेगवेगळे उपक्रम आयोजिण्यात यावेत. यात्रेमध्ये सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्यासह विद्यार्थी आणि युवकांचा सहभाग महत्त्वाचा असणार आहे. सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करुन समन्वयाने उपक्रम यशस्वी करावा, अशा सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या. महानगरपालिका, पोलीस विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरू युवा केंद्र यांच्या सहभागाने पदयात्रेचे आयोजन करण्यात आलेz आहे. सर्व विभागांनी त्यांना नेमून देण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी.यावेळी पिण्याचे पाणी, पदयात्रा मार्गावरील स्वच्छता, वाहतुकीचे सनियंत्रण, पदयात्रा मार्गावर माहिती देणारे फलक लावणे, स्वयंसेवक, पदयात्रा मार्गावर वैद्यकीय पथक नेमणे आदीबाबत आढावा घेऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांनी पदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. कुंभार यांनी केले आहे. वसंत देसाई क्रीडांगणापासून कापड बाजार, सिटी कोतवाली, शासकीय उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा पदयात्रेचा मार्ग असेल.