महाराष्ट्रराजकीय

आता पाठिंबा की हकालपट्टी?; सदा सरवणकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार?

सदा सरवणकर यांनी निवडणूक लढवण्याची भूमिका घेतल्याने आता शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव वाढण्याची शक्यता आहे. कारण भाजपचा मनसे उमेदवारासाठी दबाव आहे. याशिवाय राज ठाकरे यांनी सरवणकरांची भेट नाकारल्यामुळे त्यांची नाराजी स्पष्ट आहे. सदा सरणकर यांच्या भूमिकेमुळे राज ठाकरे यांची देखील नाराजी शिवसेनेने ओढावून घेतली आहे.

मुंबईतील दादर-माहीम मतदारसंघात सध्या चांगल्याच हाय व्होल्टेज घडामोडी बघायला मिळत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ अंतिम टप्प्यावर आली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांचे चिरंजीव आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले. पण राज ठाकरे यांनी भेट नाकारल्याची माहिती आहे. राज ठाकरे यांनी माहीम मतदारसंघातून चिरंजीव अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे राज ठाकरे यांना महायुतीकडून काही जागांवर पाठिंबा मिळणं अपेक्षित आहे. पण खुद्द राज ठाकरे यांच्या चिरंजीवालाच शिवसेनेचे सदा सरणकर यांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं.

सदा सरवणकर यांना एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर मनसेकडून अमित ठाकरे यांना त्याच मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली. यानंतर ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे या मतदारसंघात तिहेरी लढत होईल, अशी चर्चा सुरु झालेली. या दरम्यान, भाजप नेत्यांनी सदा सरवणकर यांना अर्ज मागे घेऊन अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यावा, असं आवाहन केलं. पण सदा सरवणकर उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार झाले नाहीत.

विशेष म्हणजे सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली होती. या बैठकीला सदा सरवणकर यांना बोलावण्यात आलं होतं. यावेळी सदा सरवणकर यांना विधान परिषदेवर संधी देऊ, असं आवाहन करण्यात आलं होतं. पण सरवणकर आपली उमेदवारी मागे घेण्यास तयार नव्हते, अशी माहिती समोर आली होती.

विशेष म्हणजे सदा सरणकर यांनी ट्विट करत राज ठाकरे यांच्यावर टीका केल्याचं याआधी बघायला मिळालं होतं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधी कोणत्या नातेवाईकासाठी कुणाला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितलं नाही, असा टोला सदा सरणकर यांनी लगावला होता. यानंतर राज ठाकरे यांनी शिंदे गटाच्या विरोधात राज्यभरात दिलेले सर्व उमेदवार मागे घ्यावेत तरच मी उमेदवारी अर्ज मागे घेईन, अशी भूमिका सदा सरवणकर यांनी मांडली होती. यानंतर शिवसेना भवनबाहेर आज सदा सरवणकर यांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये, असं आवाहन करणारी बॅनरबाजी केली होती.

या सर्व घडामोडी घडल्यानंतर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अतिशय कमी वेळ शिल्लक असताना सदा सरवणकर यांचे चिरंजीव समाधान सरवणकर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी गेले. पण राज ठाकरे यांनी त्यांची भेट नाकारली. “मी सरवणकर यांची भेट घेणार नाही. तुम्हाला उभं राहायचं असेल राहा किंवा राहू नका. मला काही बोलायचं नाही”, असं राज ठाकरे म्हणाल्याची माहिती खुद्द सदा सरवणकर यांनी मांडली. राज ठाकरे यांनी आपली भेट नाकारल्यामुळे आपण उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही, असं सदा सरवणकर यांनी स्पष्ट केलं.

सदा सरवणकर यांनी निवडणूक लढवण्याची भूमिका घेतल्याने आता शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव वाढण्याची शक्यता आहे. कारण भाजपचा मनसे उमेदवारासाठी दबाव आहे. याशिवाय राज ठाकरे यांनी सरवणकरांची भेट नाकारल्यामुळे त्यांची नाराजी स्पष्ट आहे. सदा सरणकर यांच्या भूमिकेमुळे राज ठाकरे यांची देखील नाराजी शिवसेनेने ओढावून घेतली आहे. अशा परिस्थितीत आता एकनाथ शिंदे सदा सरवणकर यांची पाठराखण करतात की पक्षातून हकालपट्टी करतात? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.