चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांना मिळणार ५४ हजार मोफत पुस्तके
चाळीसगाव : राज्य सरकारच्या सर्व शिक्षासाठी मोफत पाठ्यपुस्तक वितरण उपक्रमाअंतर्गत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात जळगाव जिल्ह्यातील जवळपास ४ लाख १० हजार ९१८ विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचा लाभ मिळणार आहे. चाळीसगाव तालुक्यातील ५४ हजार २१६ विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने ‘बालभारती’कडे पुस्तक संचांची मागणी सादर केली आहे.
आगामी ३१ मेपर्यंत सर्व पुस्तके वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमासाठी एकूण ५६ हजार ८९८ पुस्तक संचांची मागणी करण्यात
आली आहे. तर इंग्रजी व उर्दू माध्यमांच्या २ हजार ४२८ संचांचा ही समावेश आहे. चाळीसगावसाठी ५४ हजार २१६ पाठ्चपुस्तकांचा पुणे येथील बालभारती येथून प्रथम जिल्हास्तरावर पुरवठा केला जाणार आहे. त्यानंतर तालुका व शाळा, केंद्रांमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोहोचवण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने तयारी सुरू केली असून, विद्यार्थ्यांना वेळेत पुस्तके मिळावीत, यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू असल्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या शाळेसह अनुदानित मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना या मोफत पुस्तकांचे वाटप होणार आहे.