शेतजमिनीच्या वादातून चुलत भावाचा खूनटाकळी गावातील दोन संशयित ताब्यात
मुक्ताईनगर : शेतजमिनीच्या वादातूनचुलत भावाचाच खून केल्याची घटना टाकळी, ता. मुक्ताईनगर येथे घडली. याबाबत शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे. यात दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.सुनील रामसिंग चव्हाण (३२, रा. टाकळी ता. मुक्ताईनगर) असे या मृत तरुणाचे तर चुलत भाऊ प्रवीण जगन चव्हाण आणि बाळू ममराज जाधव (दोन्ही रा. टाकळी) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.सुनील हा परिवारासह टाकळी गावात वास्तव्याला होता. शेती आणि मजुरीचे काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करत होता. सुनील याचा चुलतभाऊ प्रवीण चव्हाण याच्याशी शेतीवरून वाद होता. २५ मार्च रोजी सायंकाळी सुनील हा मित्रांसोबत जेवण करण्यासाठी दुचाकीने बाहेर गेला होता.त्यानंतर तो घरी परतला नाही. दुसऱ्या दिवशी २६ मार्च रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास सुनील याचा मृतदेह टाकळी रस्त्यावर आढळून आला. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आढळून आल्या. याबाबत मृत सुनील याचा भाऊ संजय चव्हाण यांनी फिर्याद दिली. त्यावरून शनिवारी सायंकाळी वरील दोन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.