भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्य अनेक कार्यक्रमांचे आयोजन
अकोला – सकल ब्राह्मण समाजाचे आराध्य भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव सोहळा सालाबाद प्रमाणे यावर्षीही महानगरात दिनांक 30 एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. या जन्मोत्सव सोहळ्याच्या अनुषंगाने भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीच्या वतीने गुरुवारी मारवाडी ब्राह्मण संस्कृत विद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. जन्मोत्सव सप्ताहाचा प्रारंभ दि 24 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता खोलेश्वर येथील भगवान परशुराम चौकात ध्वजारोहण करून होणार आहे. यावेळी सकाळी 10 वाजता कोतवाली परिसरातील अनुपम भोजनालयच्यावर समितीच्या जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ होणार आहे. उत्सवात दिनांक 25 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता गंगानगर येथील सालासार बालाजी मंदिरात राजस्थानी ब्राह्मण समाजातील बालकांसाठी सामूहिक यज्ञपोवित सोहळा होणार आहे.दिनांक 26 एप्रिल रोजी भगवान परशुराम प्रीमियर लीग क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये संपूर्ण बहुभाषिक ब्राह्मण समाजातील क्रिकेट चमू मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर दिनांक 27 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता खोलेश्वर येथील भगवान परशुराम चौकात भव्य राष्ट्रीय हिंदी कवी संमेलन होणार आहे.यामध्ये राष्ट्रातील
काशीपुरी कुंदन, अकबर खान खांडवा,रूपा यादव,प्रो शशिभूषण स्नेही,आचार्य जयसीयाराम,मुकेश शंडील्या आदी
ख्यातनाम कवींची उपस्थिती राहणार आहे. दिनांक 28 एप्रिल रोजी समाजातील महिलांसाठी निमवाडी येथील संस्कृत विद्यालयात भव्य सांस्कृतिक सोहळा होणार असून यात अनेक महिलांच्या चमू आपला सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्यकला, नाट्य, एकांकिका सादर करणार आहेत.दि 29 एप्रिल रोजी साय 6 वाजता भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवावर खोलेश्वर येथील भगवान परशुराम चौकात सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने भगवान परशुरामाची पूजा अर्चना करून भव्य शोभायात्रा निघणार आहे. ही शोभायात्रा महानगरातील संपूर्ण रस्त्यावर भगवान परशुरामचा गजर करीत या शोभायात्रेचा समारोप भगवान परशुराम चौकात होणार आहे. दरम्यान महाराष्ट्रीयन ब्राह्मण युवक मंडळाच्या वतीने सिविल लाईन परिसरातील जिल्हा परिषद विश्रामगृहापासून भव्य मोटरसायकल रॅली निघून या रॅलीचे समापन शोभायात्रेत होणार आहे. दिनांक 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीया असून हा दिन भगवान परशुरामाचा जन्मोत्सव दिन ही आहे. या दिनी सकाळी 11 वाजता खोलेश्वर येथील भगवान परशुराम चौक येथे सामुहिक आरती व भगवान परशुराम पूजन सोहळा पुरोहित वर्गाच्या हस्ते होणार आहे. या सप्ताहात सकल ब्राह्मण समाजाच्या महिला पुरुष वर्गाने मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा उत्सव साजरा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.या पत्रकार परिषदेत विजय तिवारी, मोहन पांडे, भरतकुमार मिश्रा,अमोल चिंचाळे,देवेंद्र तिवारी, अशोक शर्मा लोणाग्रा, राकेश शर्मा, राधेश्याम शर्मा, राजेंद्र तिवारी, राजू डोल्या, राम शर्मा, अजय शर्मा आदी सकल ब्राह्मण समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.