मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे युद्धस्तरावर पूर्ण करा आ. साजिद खान पाहोचले ऑन स्पॉट : मनपा यंत्रणेला दिले निर्देश
AB7
मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे युद्धस्तरावर पूर्ण करा आ. साजिद खान पाहोचले ऑन स्पॉट : मनपा यंत्रणेला दिले निर्देश
अकोला : गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या दर्जाहीन नालेसफाईचा पावसाळ्यात फज्जा उडत असून नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता यावर्षी तरी असा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मान्सूनपूर्व होणारी नालेसफाई ही दर्जात्मक करण्यात यावी असे निर्देश आ. पठाण यांनी मनपा यंत्रणेला दिले. विशेष म्हणजे मनपाच्या अधिकारी – कर्मचारी वर्गाला सोबत घेत आ. पठाण यांनी नाल्यांची ऑन स्पॉट पाहणी केली व आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी मनपा उपायुक्त गीता ठाकरे, मनपाचे माजी नगरसेवक पराग कांबळे, मोहम्मद नौशाद, रवी शिंदे यांच्यासह स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.
मागील काही वर्षांपासून पावसाळ्यात शहरातील मुख्य नाल्या ब्लॉक होत त्याचे सर्व पाणी नागरिकांच्या घरात घुसण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. तर गेल्या वर्षी झालेल्या पावसाळ्यात शहरातील अनेक भागात नाल्याचे पाणी घुसल्याने त्याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागला होता. या पावसाळ्यात तरी नागरिकांच्या घरात पाणी घुसू नये त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी दर्जात्मक स्वरूपाची नालेसफाई करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश आ. पठाण यांनी शहरातील नाल्यांची ऑन स्पॉट पाहणी दरम्यान मनपा यंत्रणेला दिले. यावेळी विशेष करून कौलखेड, खडकी, खोलेश्वर, कमला नेहरू नगर, गंगा नगर, बायपास, भगत वाडी, गुलजारपुरा, मासूम शहा नगर, नाजूक नगर, तपे हनुमान मंदिर मागील परिसर, इंदिरा नगर, आपातापा रोडवरील नाला, अब्दुल कलाम चौक, जुने शहर, डाबकी रोड परिसर या परिसरात नागरिकांना पावसाळ्यात समस्या निर्माण होतात. यंदा पावसाचे पाणी साचू नये, दर्जात्मक स्वरूपाची नालेसफाई व्हावी यासाठी अद्यावत यंत्रणेचा वापर करण्यात यावा असे निर्देश आ. पठाण यांनी मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले. तर नालेसफाईच्या कामात कुठल्याही प्रकारची हयगय होऊन नागरिकांच्या घरात पाणी घुसल्यास अथवा नागरिकांचे नुकसान झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही मनपा प्रशासनाची असणार असल्याच्या सणसणीत इशारा सुद्धा यावेळी आ. पठाण यांनी दिला. मागील काही वर्षांपासून होणारी नालेसफाई ही नागरिकांच्या जीवावर उठली आहे. प्रत्येक पावसाळ्यात अनेक ठिकाणी नाले ब्लॉक होऊन सदर पाणी नागरिकांच्या घरात घुसण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सुद्धा घडले आहे. यंदा मात्र नालेसफाईच्या कामात कुठल्याही प्रकाराची हयगय खपवून घेतली जाणार नसून जर पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात घुसले तर मनपाने संबंधित नागरिकाच्या होणाऱ्या नुकसानाची भरपाई द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आ. पठाण यांनी दिला.