पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न; आरोपीला अटक
नेर : एक वर्षापूर्वी प्रेम प्रकरणाच्या वादात तरुणाच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपीला नेर पोलिसांनी अखेर सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली.किशोर शंकर पवार (३५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तालुक्यातील रत्नापूर ढेका बेडा येथे राहणारा अमन मारुती पवार (२२) याचे एका तरुणीवर प्रेम होते. तरुणीच्या घरातून प्रेम प्रकरणाला विरोध असल्याने अमन व तरुणी हे दोघेही जून २०२४ मध्ये मुंबई येथे पळून गेले होते. त्यानंतर ४० दिवसांनी परत आले. काही दिवसांनी तरुणी आपल्या पित्याच्या घरी परत गेली. तेव्हापासून या दोन्ही कुटुंबात किरकोळ वाद सुरू होते. यातूनच ही घटना घडली होती.सापळा रचून केले जेरबंद९ ऑगस्ट २०२४ रोजी फिर्यादी अमन घरी असताना त्याच्या घरासमोर युवराज प्रभूलाल भोसले (४५), बिजू बिजूलाल भोसले (४०), समसकला भोसले (४०), हिरोना पवार (३०), किशोर शंकर पवार (३५), इरान भोसले (२८), सर्व रा. रत्नापूर ढेका यांनी तू आमच्या मुलीला पळवून का नेले. या कारणावरून वाद घालून पेट्रोल अमनच्या अंगावर टाकून आग लावली. यात त्याची पाठ जळाली. आरडाओरड केल्याने आरोपींनी पळ काढला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक किशोर खंदार यांनी केला होता. दरम्यान, यातील पाच आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळवला. मात्र, किशोर पवार हा आरोपी घटनेपासून पसार होता. डीवायएसपी रोहित ओव्हाळ यांना सदर आरोपी मुंबईवरून नेर येथे येत असल्याची टीप मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. ही कारवाई पोलिस उपाधीक्षक रोहित ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनात सचिन डहाके, गजानन पत्रे, आकाश खेत्रे, प्रवीण फुंडे, राजेंद्र सरदारकर आदींनी केली.