बाबाजानी दुर्राणी आणि टीमच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध एसआयटी मार्फत चौकशी होणार आ. साजिद खान यांची लक्षवेधी : महसूलमंत्री ना. बावनकुळे यांची सभागृहात घोषणा
Ab7
बाबाजानी दुर्राणी आणि टीमच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध एसआयटी मार्फत चौकशी होणार आ. साजिद खान यांची लक्षवेधी : महसूलमंत्री ना. बावनकुळे यांची सभागृहात घोषणा
अकोला : परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे शासकीय सर्व्हिस रोडच्या जागेवर कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता उभारलेल्या संकुलावर कारवाई करण्याची मागणी करीत आ. साजिद खान पठाण यांनी विधिमंडळ सभागृहात लक्षवेधी लावली. सदर प्रकरणी राज्याचे महसूल मंत्री ना. बावनकुळे यांनी बाबाजानी आणि टीमची बरीच अनधिकृत प्रकरणे समोर येत असून हा आकडा तीस प्रकरणांच्या जवळपास असल्याचे नमूद करीत या सर्व प्रकरणांची चौकशी आता एसआयटी नेमत करणार असल्याची घोषणा केली. माजी आमदार तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बाबाजानी दुर्राणी यांनी आपल्या गेल्या तीन टर्मच्या आमदारकीच्या काळात पदाचा दुरुपयोग करीत पाथरी तालुक्यात शासनाच्या मालकीच्या असलेल्या सर्व्हिस रोडवर शासनाची कुठल्याही प्रकाराची परवानगी न घेता बाबा नामक अनधिकृत संकुलाची निर्मिती केली. सदर संकुलाप्रकरणी तात्कालीन मुख्यमंत्री यांच्या काळात सुद्धा लक्षवेधी लागली होती. त्यानुसार चौकशी करण्यात आली असता त्यामध्ये सदर संकुल हे अनधिकृत असल्याचा अहवाल चौकशी समितीने सदनासमोर आणला होता तरी मात्र याप्रकरणी अद्यापही कुठल्याही प्रकारची कारवाई का करण्यात आली नाही ? त्या व्यक्तीची एवढी दादागिरी आहे की त्यासमोर प्रशासन सुद्धा हतबल आहे असा आरोप करीत पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी सभागृहात लक्षवेधी लावली. त्या लक्षवेधीच्या अनुषंगाने राज्याचे महसूल मंत्री ना. बावनकुळे यांनी उत्तरादाखल सांगितले की, बाबाजानी दुर्राणी आणि टीमचे हे एकच प्रकरण आपल्यासमोर नसून त्यांच्या या भ्रष्ट कारभाराचे तब्बल तीस प्रकरणे आपल्यासमोर आली आहेत, आणखीनही काही प्रकरणे येण्याची शक्यता असून या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात येणार असून त्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे. महसूल मंत्री यांच्या या घोषणेने बाबाजानी दुर्राणी आणि टीमला दणका बसला असून बाबाजानी यांची अनेक भूखंडप्रकरणी गैरप्रकार समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.