मनपा उभारणार नायगाव डम्पिंग ग्राऊंडवर सौरऊर्जा प्रकल्प !
अकोला : महान धरणासह शिलोडा येथे सौरऊर्जा प्रकल्प सुरूकेल्यानंतर आता महापालिका प्रशासनाने नायगाव येथील डम्पिंग ग्राउंडवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी ही संकल्पना मांडली असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून वीजनिर्मिती करण्याचा विचार महापालिका करीत आहे. त्या दृष्टिकोनातून शासनाकडे लवकरच प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. नायगाव येथे महापालिकेचे डम्पिंग ग्राउंड आहे. डम्पिंग ग्राउंड ८ ते १० एकराचा परिसर आणि याठिकाणी टिनाचे मोठे शेड असून, याठिकाणी दररोज शहरातील १२० टनच्या जवळपास कचरा संकलित केला जातो. एवढ्या मोठ्या परिसरात एक ते दोन मेगावॉटचा प्रकल्प उभारण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी स्वच्छता व विद्युत विभागाला सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे विद्युत विभाग लवकरच सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक असलेला प्रस्ताव तयार करणार असून, हा प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठविण्यात येईल. शासनाने प्रस्ताव मान्यता दिल्यानंतर सौरऊर्जा प्रकल्पाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती मनपा विद्युत विभागाचे अभियंता अमोल डोईफोडे यांनी दिली आहे.