चाळीसगाव-छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी
AB7, कविता वाघ चाळीसगाव प्रतिनिधी
चाळीसगाव-छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी
चाळीसगाव : चाळीसगाव-छत्रपतीसंभाजीनगर या रेल्वेमार्गाच्या अंतिम सर्वेक्षणासाठी केंद्र सरकारकडून मंजूरी मिळाली आहे. याबाबतचे आदेश बुधवारी दिल्ली रेल्वेबोर्डाच्या गतीशक्ती विभागाचे निर्देशक अभिषेक जगावत यांनी जारी केले आहे. सर्वेक्षणासाठी ८ कोटी ३२ लाख ५० हजार रुपयांच्या निधीचीही तरतूद करण्यात आली आहे. या रेल्वेमार्गामुळे दक्षिण आणि उत्तर भारत जोडला जाणार आहे.छत्रपती संभाजीनगरहून चाळीसगावमार्गे उत्तरेकडे जाण्यासाठी हा मार्ग महत्वाचा असून मध्ये आठ किमीचा अवघड वळणाचा औट्रम (कन्नड) घाट आहे. याच घाटमार्गामुळे छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव यादरम्यान वाहतुकीचा प्रश्न जटील झाला आहे. गेल्या वर्षभरापासून घाटातील अवजड वाहनांची वाहतूक औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशान्वये बंद आहे. याबाबत खंडपीठात जनहित याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालयाने अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घाटात बोगदा करण्याचा प्रस्ताव स्विकारला आहे.मराठवाड्यातून खान्देशात दरदिवशी १० हजार प्रवासीचाळीसगाव – छत्रपती संभाजी नगर रेल्वेमार्गामुळे प्रवाश्यांची मोठी सोय होणार असली तरी, भारतातील दक्षिण -उत्तर व्यापाऱ्यालाही हा मार्ग वरदान ठरणार आहे. खान्देशातून मराठवाड्यात दरदिवशी १० हजार नागरिक प्रवास करतात. रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी रेल्वेच्या गतीशक्ती विभागाकडून निधी मंजूर केला गेला आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून ५० टक्के तर ५० टक्के निधी राज्य शासनातर्फे उपलब्ध करुन दिला जाणार आहेछत्रपती संभाजीनगर -चाळीसगाव रेल्वेमार्गामुळे दक्षिण व उत्तर या दोन दिशा जोडल्या जाणार आहे. यामुळे या दोन्ही भागांना विकासाची नवी संधी मिळेल. प्रवाश्यांसाठी तर ही आनंदवार्ताच आहे. सर्वेक्षणाच्या कामावर पंतप्रधान कार्यालयाकडून देखरेख केली जाणार आहे.
-अनंत बोरकर, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे कृती समिती, संभाजीनगर