शौचालय नसल्याने पत्नी माहेरी, पतीला नाहक मनस्ताप
अकोल्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ या चित्रपटाचा सिक्वेल वाटावा, असाच काहीसा प्रकार अकोल्यात समोर आला आहे. घरात शौचालय नाही, शौचालयाला उघड्यावर जावं लागतं, म्हणून रागानं एका पत्नीनं आपल्या पतीला सोडून माहेर गाठलं आहे. अकोल्यातल्या दिग्रस गावातला हा प्रकार आहे. विशेष म्हणजे, घरात शौचालय बांधलं जात नाही, तोपर्यंत परत सासरी येणार नाही, अशी अट देखील बायकोने नवऱ्यासमोर ठेवली आहे. अकोल्यातील हा प्रकार सध्या चांगलाचं चर्चेचा विषय बनला आहे. अकोल्यातील दिग्रस गावात तायडे कुटुंब वास्तव्यास आहे. तायडे कुटुंबातीलच विकास तायडे यांचं खामगावातीलग्रामपंचायत कार्यालय दिग्रस बु., पं.स. पातुर, जि. अकोला.विशाखा यांच्याशी लग्न झालं. मात्र वर्षभरातचं तायडे कुटुंबात वाद सुरू झाला, अन् कुटुंब विभागलं गेलं. कुटुंबातील दोघा भावांनी संपत्ती वाटून घेतली. दोन खोल्या या विकास यांच्या मोठ्या भावाच्या वाट्याला गेल्या तर दोन खोल्या विकास यांना मिळाल्या. मात्र विकास यांच्या वाट्याला ज्या दोन खोल्या आल्या त्यामध्ये शौचालय नव्हतं. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला शौचालयास उघड्यावर जावं लागायचं. यावरून दोघा नवरा बायकोंमध्ये खटके उडायला सुरुवात झाली.अखेर विशाखा यांनी थेट आपलं माहेर गाठलं, जोपर्यंत शौचालय बनत नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही, अशी अट तीने आपल्या पतीला घातली आहे. विकासने घरात शौचालय बांधण्याचं पत्नीला वचन दिलं खरं, मात्र ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभारामुळे शौचालयाच्या बांधकामासाठी मोठी अडचण त्याच्यासमोर उभी ठाकली आहे. घरासमोरील नालीचे बांधकाम अपूर्ण असल्याने सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लागत नाही. परिणामी,शौचालयाचा वापर करणे अशक्य झालं आहे. त्यामुळं उघड्यावर शौचालयाला जाव लागत आहे, शेवटी कंटाळून आता याची तक्रार पातुरच्या गट विकास अधिकाऱ्याकडे केली आहे. तर दुसरीकडे विकास दररोज घराच्या दरवाज्यात बसून विशाखा यांची वाट बघत आहेत. गावात ठिकठिकाणी शौचालय आणि स्वच्छता संदर्भात भिंतीवर रंगरांगोटीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे विकास तायडे यांच्या कुटुंबाला ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराचा मोठा फटका बसला आहे. नालीच्या अपूर्ण बांधकामामुळे अनेक कुटुंब उघड्यावर शौचालयाला जात आहेत. त्यात आता ग्रामपंचायतीने शौचालयाला उघड्यावर जाणाऱ्यांवर कारवाई होणार, अशी गांवात दवंडी दिली आहे, त्यामुळे करावं तर काय करावं? असा प्रश्न आता या कुटुंबांपुढे आहे.