> *भाजपाच्या निलंबित पदाधिकाऱ्यांचे मुंबई येथील उपोषण स्थगित*
अकोट : अकोट विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्षातून अयोग्यपणे निलंबित करण्यात आल्याने त्यांनी २७ जानेवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन तथा साखळी उपोषण करण्याचे ठरविले होते. परंतु वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर सदर उपोषण स्थगित करण्यात आले आहे. २७ जानेवारी रोजी आझाद मैदान मुंबई येथे ठिय्या आंदोलन करण्याकरिता निलंबित करण्यात आलेले पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित झाले होते. तेथे या पदाधिकाऱ्यांशी आझाद मैदान पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक दळवी यांनी चर्चा करून भाजपाचे प्रदेश कार्यालय मंत्री मुकुंद कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला. तसेच या सर्व कार्यकर्त्यांशी त्यांची चर्चा घडवून आणली. या चर्चेमध्ये कार्यालय मंत्री कुलकर्णी यांनी पूर्ण विषय समजावून घेऊन सदर निलंबन हे अयोग्य असल्याचे सांगितले. लगेच त्यांनी भाजपाचे शिस्तपालन समितीचे अध्यक्ष अनिल सोले यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून याच आठवड्यात शिस्तपालन समितीची सभा घेऊन त्यांच्या सर्व मागण्यांवर न्याय देण्याचे कळवले. चर्चेअंती समाधानकारक उत्तर मिळाल्याने साखळी उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमार्फत घेण्यात आला.