अकोलेकरांसाठी सांस्कृतिक भवन व तरण तलाव लवकरच होणार उपलब्ध
Friday, January 03, 2025
कला व नाट्यप्रेमींसाठी उपलब्ध होणार हक्काचे व्यासपीठ
अकोला- अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील कला, संस्कृती व नाट्यकर्मींसाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, त्यांच्या कौशल्याला अधिकाधिक प्रेरणा मिळावी, यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे तथा माजी आमदार स्व. गोवर्धन शर्मा यांनी अकोल्यात भव्य आणि अत्याधुनिक असे सांस्कृतिक भवन आणि सुसज्ज तरण तलाव निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले होते. तसेच अकोल्याचे प्रसिद्ध नाट्यकर्मी राम जाधव यांनी सांस्कृतिक भवनासाठी आ. रणधीर सावरकर यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार आ. रणधीर सावरकर यांनी शासनाकडे पाठपुरावा करून व प्रयत्नांची पराकाष्टा करून अकोल्यात अत्याधुनिक सांस्कृतिक भवनासह अत्यंत सुसज्ज असा तरण तलाव निर्मितीसाठी निधी प्राप्त केला. त्यातून काही वर्षांपूर्वी काम प्रारंभ झाले. आता हे काम पूर्णत्वाकडे जात आहे. या कामाची पाहणी शुक्रवार, 3 जानेवारी रोजी आ. रणधीर सावरकर व खा. अनुप धोत्रे यांनी केली. कला आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अकोल्यातील विद्यार्थी व तरुणांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अकोल्याला नावलौकिक प्राप्त करून दिला आहे. त्यांना आपल्या कलेच्या सादरीकरणासाठी व सरावासाठी सांस्कृतिक भवनासारखे एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले तर अकोल्याचे नाव कला व सांस्कृतिक क्षेत्रात आणखी मोठे होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन आ. रणधीर सावरकर यांनी अकोल्यातील कला व सांस्कृतिक क्षेत्रातील विद्यार्थी, तरुण व नाट्यकर्मींसाठी एक अत्याधुनिक सांस्कृतिक भवनाची निर्मिती करण्यासाठी गेल्या काही वर्षांपूर्वी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. राज्य शासनाकडून या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार कामाचा प्रारंभही झालात होता. परंतु मध्यंतरी या कामात बदल करण्यात आल्याने हे काम रखडले होते. आता पुन्हा आ. सावरकर यांनी हे काम पूर्ण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून राहिलेल्या कामासाठी निधी प्राप्त करून दिला. त्यातून अकोल्यातील सांस्कृतिक भवनाचे व सुसज्ज तरण तलावाचे काम आता पूर्णत्वाकडे जात असून लवकरच अकोला शहर व जिल्ह्यातील कला व सांस्कृतिक क्षेत्रातील विद्यार्थी, तरुणांसह नाट्यकर्मींना अत्याधुनिक सांस्कृतिक भवन तसेच जलतरणपटूंना सुसज्ज असा तरण तलाव उपलब्ध होणार आहे. या सर्व कामाची पाहणी आ. रणधीर सावरकर व खा. अनुप धोत्रे यांनी शुक्रवार, 3 जानेवारी रोजी केली. सुचविलेल्या दुरुस्त्यांसह सर्व काम दर्जेदार पद्धतीने लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी त्यांच्यासोबत माजी महापौर विजय अग्रवाल, जयंत मसने, गीतांजली शेगोकार, राहुल देशमुख, सारिका जयस्वाल, संदीप गावंडे, विवेक भरणे, माधव मानकर, योगेश मानकर, विठ्ठल गावंडे, आरती घोगलिया, पवन महल्ले, देवाशिष काकड यांची उपस्थिती होती. तसेच सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील, मृणाली डिगारे, अनिल गिरी, शैलेश गेडाम, यश मालाने, किरण देशपांडे यांचीही यावेळी उपस्थिती होती.