श्रींच्या पालखीचे पंढरपूरकरिता २ जून रोजी प्रस्थानपालखीचे ५६ वे वर्ष
शेगाव, १० मेश्रीक्षेत्र पंढरपूर येथे दरवर्षी आषाढी निमित्त मोठी यात्रा भरते. देशभरातून अनेक भाविक तिथे दर्शनाला जातात. त्यात वारकऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. या आषाढी वारीसाठी येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी यंदा शेगावहून २ जून रोजी प्रस्थान करणार आहे.परंपरेनुसार यंदाही श्रीसंत गजानन महाराज संस्थानची श्रींची पालखी ज्येष्ठ शु. ७ म्हणजेच २ जून रोजी सकाळी ७ वाजता पंढरपूरकडे प्रस्थान करेल. पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याचे संस्थानचे हे ५६ वे वर्ष आहे. श्रींच्या पालखीत जवळपास सातशे वारकऱ्यांसह टाळकरी, वारकरी, पताकाधारी सहभागी होणार आहेत.पंढरीनाथांच्या भेटीसाठी प्रत्यक्ष शेगावच्या योगी गजाननाने हजारोवारकऱ्यांसह वारी केल्याचे दाखले मिळतात. त्यामुळे येथील वारीला असलेली परंपरा ही संतांनी दाखविलेल्या मार्गावर गेल्या ५५ वर्षांपासून अव्याहतपणे जपली जात आहे.या दिंडीमध्ये एक वीणेकरी, टाळकरी व पताकाधारी स्वयंशिस्तीने चालत असतात. मजल दरमजल करीत ठरलेल्या ठिकाणी मुक्काम, तिथे भजन, कीर्तन, प्रवचन करीत भागवत धर्म वाढवण्याचा प्रयत्न करतात. मार्गावरील अनेक छोट्या मोठ्या गावांना आनंदात सहभागी होण्याचे भाग्य मिळते.श्रींच्या पालखीचा पंढरपूर पायदळ प्रवास२ जून रोजी श्रीक्षेत्र नागझरी येथील संत गोमाजी महाराज संस्थानमध्ये महाप्रसादानंतर सायंकाळी अकोला जिल्हयातील पारस येथे श्रींच्या पालखीचा रात्रीचा मुक्काम राहील. ३ जून रोजी पारस येथून गायगाव येथे, तर रात्री भौरद येथे श्रींच्या पालखीचा मुक्काम राहील. त्यानंतर अकोला येथे ४ व ५ जून असे दोन दिवस मुक्काम राहील. ६ जून रोजी सकाळी भरतपूर-वाडेगाव, ७ जून रोजी देऊळगाव (बाभूळगाव) पातूर, ८ जून मेडशी श्रीक्षेत्र डव्हा, ९ जून मालेगाव शिरपूर जैन, १० जून चिंचापा पेन म्हसला पेन, ११ जून किनखेडा रिसोड, १२ जून पानकन्हेरगाव- सेनगाव, १३ जून श्रीक्षेत्र नरसी (नामदेव) तेथून पुढे पालखीचा नेहमी प्रमाणे प्रवास राहणार आहे.