ताज्या घडामोडी

प्रजासत्ताकदिनाचा मुख्य सोहळा शास्त्री क्रीडांगणावर उत्साहात साजरा पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहणराज्यात सर्वसमावेशक विकासप्रक्रियेला गती – पालकमंत्री आकाश फुंडकर

AkolaB7

 प्रजासत्ताकदिनाचा मुख्य सोहळा शास्त्री क्रीडांगणावर उत्साहात साजरा पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहणराज्यात सर्वसमावेशक विकासप्रक्रियेला गती – पालकमंत्री आकाश फुंडकर

अकोला : केंद्र व राज्य शासनाने विविध योजना- उपक्रमांद्वारे समाजातील वंचित, गरीब, अनाथ, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला या सर्वांच्या विकासासाठी सर्वसमावेशक विकासप्रक्रियेला गती दिली आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी आज येथे केले.
भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिन समारंभानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथे उत्साहात झाला, प्रारंभी पालकमंत्री श्री. फुंडकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण, तसेच राष्ट्रगीत, राज्यगीत व पथसंचलन झाले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी नागरिकांना संबोधित केले. आमदार रणधीर सावकर, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, ‘महाबीज’चे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर, महापालिका आयुक्त सुनील लहाने, माजी आमदार वसंतराव खोटरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. फुंडकर म्हणाले की, साडेसात दशकांच्या प्रवासात देशाने जगभरात प्रगतीचे किर्तीमान मानदंड निर्माण केले आहेत. पायाभूत सुविधा, उद्योग, कृषी, रोजगार, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांत देश देदिप्यमान कामगिरी करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची महासत्ता होण्याकडे वाटचाल होत आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांतील प्राधान्याच्या कामांसाठी सातकलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर करण्याचा प्रयत्न होत आहे. संकेतस्थळ अद्ययावतीकरण, इज ऑफ लिव्हिंग, स्वच्छता, प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, तक्रार निवारण प्रणाली, आवश्यक सुविधा, अभ्यागतांना आवश्यक सोयी-सुविधा, माहिती सहजमिळण्याची सोय आदींमुळे नागरिकांना प्रभावी सेवा मिळणार आहेत.ते पुढे म्हणाले की, सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून प्रत्येक योजना अधिकाधिक लोकाभिमुख करण्यावर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात शेतकरी बांधवांसाठी अनेक योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 1 लाख 2 हजार 176 पात्र शेतकऱ्यांना 643 कोटी 36 लक्ष रू. इतका लाभ देण्यात आला आहे. तसेच प्रोत्साहनपर लाभ योजनेत 20 हजार 512 लाभार्थ्यांना 89 कोटी 49 लक्ष इतकी रक्कम वितरित करण्यात आली. खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक अर्थसाह्य, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना, ‘मनरेगा’ तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत फळबाग लागवड प्रतिथेंब अधिक पीक योजना, सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना, कृषी यांत्रिकीकरण योजना, पीक विमा, पोकरा आदी विविध योजनांच्या अंमलबजावणीची माहिती त्यांनी दिली.ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यात पायाभूत सुविधांची उभारणीही गतीने होत आहे. गत अडीच वर्षांत रस्त्याची 895 कोटी किंमतीची कामे मंजुर करण्यात आली. त्यापैकी 91 कामे पुर्ण झाली आहेत. 309.20 कि.मी. लांबीचे रस्ते व 39 पुल पूर्ण झाले. शासकीय इमारतींची 23 बांधकामे मंजुर असून, 3 पूर्ण व 14 प्रगतीत आहेत. अकोला येथील महिला व बालविकास भवन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, मुर्तिजापूर येथे नवीन न्यायालयीन इमारत, अकोला येथे नविन कौटुंबिक न्यायालय इमारत, अकोला येथील डाबकी रेल्वे उड्डाण पुल, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इमारत, अकोट तहसील कार्यालय या महत्वपूर्ण इमारतींचा समावेश आहे. आगामी काळात शासकीय वैद्यकीय रुग्णालयाची येथील बाह्य रुग्ण इमारत, नवीन वॉर्ड इमारत निर्माण होणार आहे. जिल्हा नियोजन समितीकडून अत्याधुनिक जागतिक दर्जाचे मॉड्युलर ऑलिम्पिक जलतरण तलाव, महिला रुग्णालय अकोला येथील इफ्ल्युएंट ट्रिटमेंट प्लांट हा पर्यावरणपूरक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प निर्माण करण्यात येणार आहे. नगरविकास विभागामार्फत 1200 प्रेक्षक क्षमतेच्या सांस्कृतिक सभागृहाच्या अंतर्गत सजावटीचे काम प्रगतीपथावर आहे. अकोल्याची सांस्कृतिक समृद्धी वाढविणारे हे भवन ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत एकूण 54 .87 कोटी निधीतून आतापर्यंत 17 लक्ष 96 हजार 795 मनुष्यदिननिर्मिती करण्यात आली. त्यातून 51 हजार 595 कुटुंबांना रोजगार मिळाला. मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंदरस्ता योजना, प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, दलितेतर व नगरोत्थान योजना, आरोग्य विभाग, औद्योगिक प्रशिक्षण संस्था बळकटीकरण, क्रीडांगण विकास, व्यायामशाळा, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अशा योजना- उपक्रमांच्या अंमलबजावणीची माहिती त्यांनी यावेळी दिली. गुन्हेगारीचे उच्चाटन करण्यासाठी अकोला व अकोट शहरासाठी सीसीटीव्ही यंत्रणांसाठी 9 कोटी रू. निधी मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात अकोला जिल्हा राज्याच्या क्रमवारीत दुसरा असून गतवर्षी उद्दिष्टाहून अधिक 953 प्रकरणे मंजूर करण्यात आली. जिल्ह्यात प्रत्येक घटकासाठी विविध योजना व्यापकपणे राबवल्या जात आहेत. विकासाची ही प्रक्रिया अश्याच निर्धाराने पुढे नेण्यासाठी आपण सर्वजण एकजूट होऊया, या मंगलमय पर्वावर देशहितासाठी कृतीशील व कर्तव्याप्रती बांधील होण्याचा संकल्प आपण करूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.समारंभात राष्ट्रध्वज वंदन झाल्यानंतर जिल्हा पोलीस दल, बिनतारी संदेश यंत्रणा, दंगल नियंत्रण पथक, सक्षम, प्रादेशिक परिवहन पथक आदी विविध पथकांनी दिखामदार पथसंचलन केले. त्याला उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट व देशभक्तीपर घोषणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पालकमंत्र्यांनी स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबिय, वीरमाता, वीरपत्नी यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर रचना व नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी विविध पुरस्कार प्राप्त अधिकारी, कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी, आपत्ती व्यवस्थापन पथक, स्वयंसेवी संस्था आदींना त्यांच्या कामगिरीबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

 जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

अकोला, दि. 26 : भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिन समारंभानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत, राज्यगीत कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी सर्व अधिकारी व कर्मचा-यांशी संवाद साधून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपविभागीय अधिकारी अनिता भालेराव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, जिल्हा सूचनाविज्ञान अधिकारी अनिल चिंचोले, श्रीनिधी वाजपेयी, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. सोनखासकर, कैलास देशमुख यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.