बोटावर लावली शाई, मतदान कार्ड केले जमा, 1500 रुपयांवरून छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा
मतदानाच्या एक दिवस अगोदर राज्यात अनेक ठिकाणी नाट्यमय घडामोडी घडल्याचे समोर येत आहे. कुठे नेत्यांवर दगडफेक करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी इतर घटना घडल्या आहेत. छत्रपती संभाजनगर शहरात तर मतदान न करण्यासाठी पैसे वाटप झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. काय आहे हा प्रकार...
प्रचाराचा तोफा थंडावल्या असल्या तरी मतदानापूर्वी खऱ्या प्रचाराला सुरूवात होते असे बोलले जाते. कयामत की रात असा उल्लेख मतदानापूर्वीच्या एक दोन रात्रींचा करण्यात येतो. राज्यात उद्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. मतदानाच्या एक दिवस अगोदर राज्यात अनेक ठिकाणी नाट्यमय घडामोडी घडल्याचे समोर आले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर नागपूरमध्ये तर नांदेडमध्ये एका उमेदवारावर दगडफेक करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी इतर घटना घडल्या आहेत. छत्रपती संभाजनगर शहरात तर मतदान न करण्यासाठी पैसे वाटप झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. काय आहे हा प्रकार…
छत्रपती संभाजीनगर शहरातील पश्चिम विधानसभा मतदारसंघात हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. मतदान कार्ड आणि आधार कार्ड जमा करून मतदान न करण्यासाठी मतदारांना पैसे वाटप करण्यात येत असल्याचं समोर आलं आहे. जवाहरनगर पोलिसांच्या हद्दीत हा प्रकार घडल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. दोघांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे.
मतदान न करण्यासाठी 1500 रुपये वाटप करण्यात येत आहे. त्यापोटी मतदारांकडून मतदान कार्ड, आधार कार्ड घेण्यात येत होते. त्यांच्या बोटावर शाई लावण्यात येत होती, असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे यांनी केला आहे. त्यांनी तात्काळ जवाहर नगर पोलीस ठाणे गाठले. पैसे वाटप करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी अशी मागणी केले. तर निवडणूक आयोगाने या प्रकारावर कडक कारवाईची मागणी त्यांनी केली.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी या सर्व प्रकारावर सोशल मीडिया, एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यानुसार, “छत्रपती संभाजीनागरच्या जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोटाला शाई लावून, निवडणूक ओळखपत्र जमा करून घेऊन पैसे वाटप होत असल्याची बाब समोर आली आहे. या दरम्यान पोलिसांनी साधारण १८ लाखांची रक्कम जमा करून घेत अंदाजे २ कोटींची रक्कम आमदार संजय शिरसाट यांच्या फोननंतर सोडण्यात आल्याची माझी माहिती आहे. याचा अर्थ बहुदा निवडणूक आयोगाला संभाजीनगरात निःपक्षपाती निवडणूक घ्यायची नाही. ‘कर्तव्यदक्ष’ जिल्हाधिकारी आणि सगळी निवडणूक यंत्रणा असताना शाई कोणाच्या सांगण्यावरून आणि कशी बाहेर आली, हा प्रश्न आहे. याचा तातडीने निवडणूक आयोगाने खुलासा करायला हवा आणि प्रकरणात तातडीने कायदेशीर कारवाई करावी.” अशी मागणी केली आहे.