बाल्कनीतून पडलेला चिमुकला बचावला
नाशिक : एका अपार्टमेंटच्या पहिल्यामजल्यावरील बाल्कनीतून डोकावताना चिमुकला खाली कोसळतानाच्या घटनेचा व्हिडिओ गुरुवारी (दि.२७) सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. या व्हिडिओची सत्यता पडताळली असता ही घटना शनिवारी (दि.२२) सायंकाळच्या सुमारास घडली असून यामध्ये दैव बलवत्तर असल्यामुळे तीन वर्षाचा मुलगा बालंबाल बचावला. त्याच्या हातापायांना दुखापत झाली असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे स्पष्ट झाले.गंगापूर रोड परिसरातील निर्मला कॉन्व्हेंट शाळेपासून पुढे असलेल्या दत्त मंदिराजवळच्या सहदेवनगरात सुमित पॅलेस अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर भाडेतत्त्वावर शिंदे कुटुंबीय वास्तव्यास आहे. त्यांचा तीन वर्षांचा चिमुकला श्रीराज हा शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास खेळताना बाल्कनीत आला. तो यावेळी बाहेरच्या परिसरात डोकावण्याच्या प्रयत्नात असताना अचानकपणे त्याचा तोल गेला अन् तो खाली कोसळला.